अहिल्यानगर | प्रतिनिधी
Ahilyanagar employee news: लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची बैठक बुरुडगाव रोडवरील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) कार्यालयात पार पडली. यावेळी अवतार मेहेर बाबा ट्रस्ट आणि कामगारांदरम्यान होणाऱ्या नवीन कराराबाबत युनियनमध्ये सविस्तर चर्चा झाली. युनियनला विश्वासात घेऊन करार केला गेला नाही तर आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा युनियनने ट्रस्ट प्रशासनाला दिला.
बैठकीचे अध्यक्षस्थान लाल बावटा जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांनी भूषवले. या बैठकीत युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सी. एस. देशमुख, सुभाष शिंदे, विजय भोसले, सुनिता जावळे, चंद्रकला देशमुख, रामदास कल्हापुरे, राजेंद्र मोरे, दिगंबर माने आदी उपस्थित होते.
अवतार मेहेर बाबा ट्रस्टसोबत युनियनचा विद्यमान करार 2023 ते 2026 कालावधीसाठी असून तो मार्च 2026 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्याआधी नवीन कराराची रूपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत कामगारांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर २५ ते ३० हजार रुपये वाढीव पगार, घरकुल योजना तत्काळ राबविण्याची मागणी, २४ तास मोफत आरोग्यसेवा अवतार मेहेरबाबा हॉस्पिटलमध्ये, कामगार प्रतिनिधीला ट्रस्टच्या विश्वस्त पदावर स्थान देणे, बोनस रकमेतील वाढ करणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.
युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार म्हणाले की, ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा सन्मान आणि स्थैर्य आम्हाला महत्त्वाचे आहे. युनियनच्या माध्यमातून अनेक समस्या सुटल्या असून कामगारांचा आत्मविश्वास वाढला आहे. एकजुटीने लढल्यास हा नवीन करार कामगारांच्या हिताचा ठरेल.
कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, ट्रस्टचा पाया कामगारांच्या घामावर उभा आहे, मात्र कामगार वर्षानुवर्षे त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात. कामगारांच्या घामाचा दर ठरविण्याचा हक्क फक्त कामगारांनाच आहे. सर्व कामगारांचा हिताचा विचार करूनच नवीन करार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


