नगरतालुका | प्रतिनिधी
ahilyanagar cultural: निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे मंगळवार, ता. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळी होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले. म्हणजेच सर्वच क्षेत्रात चळवळी होऊन अस्थिरता निर्माण होणार आहे. याशिवाय खंडात रक्ताचा पूर वाहणार, युध्दजन्य परिस्थिती राहणार, जेठुडी कठीण जाईल आणि काही ठिकाणी मोडघड होईल असेही सांगण्यात आले.
या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षीचे चळवळीचे भाकित यावर्षी आरक्षणाच्या आंदोलने व सोन्याचे उच्च भाव यासह तंतोतंत खरे ठरले. तसेच मागील वर्षी लक्ष्मीला पिडा असल्याचे भाकित वर्तविले गेले होते, त्यानुसार यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सर्वत्र शेतीचे नुकसान झाले आहे.
भगत नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिले, ज्यामुळे अनेक भाविकांचा काळजाचा ठोका चुकला. गावात पशुहत्या बंदीचे पालन करून देवाला भाजी-भाकरीचे नैवद्य दाखविले. सकाळी बिरोबाच्या ओव्या सादर करण्यात आल्या. भगत भुसारे यांनी स्वत:च्या अंगावर वेताचे फटके ओढून होईक (भविष्यवाणी) सांगितले.

ते म्हणाले की, लक्ष्मीला पीडा असल्याने पशुधन आणि शेतीला हानी होऊ शकते. बाळांना या वर्षी संकट नाही. दिवाळीच्या सुमारास अडीच ते पाच दिवस पाऊस पडेल, काही ठिकाणी नुसता आभाळ फिरेल. सध्याच्या पिकांना रोगराईचा धोका आहे, तर कापूस, गहू व हरभऱ्याची पेर मनभाव राहणार आहे.
ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, नामदेव जाधव, बाबासाहेब जाधव, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, सागर कापसे, बबन कापसे, बाबा जाधव, बाबा पुंड, अंशाबापू शिंदे, संजय डोंगरे, संजय कापसे, ठकाराम शिंदे, बाळू भुसारे, युवराज भुसारे, पांडुरंग गुंजाळ, राजू भुसारे, अंबादास निकम, कचरु कापसे आदी उपस्थित होते. पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.

हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


