Ahilyanagar astrologist: या वर्षी लक्ष्मीपूजन नेमके 20 ऑक्टोबरला करावे की 21 ऑक्टोबरला, याबाबत जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात अंकज्योतिषातील प्राचीन आणि अचूक चक्रीय अष्टकवर्ग या ज्योतिष पद्धतीचे अभ्यासक संतोष घोलप (अहिल्यानगर) यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे.
घोलप यांच्या मते, लक्ष्मीपूजन मुहूर्त (दीपावली) यंदा 21 ऑक्टोबर 2025, मंगळवार, सायं. 6.11 ते 8.34 या कालावधीत आहे. या दोन तास ते तेवीस मिनिटांच्या प्रदोषकाळातच लक्ष्मीपूजन करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
घोलप यांनी पुढे स्पष्ट केले की, या वर्षी अमावास्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.45 पासून सुरू होऊन 21 ऑक्टोबर रोजी सायं. 5.55 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे “लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे?” असा संभ्रम निर्माण झाला आहे.
या संदर्भात प्राचीन ग्रंथ — ‘धर्मसिंधु’, ‘पुरुषार्थ चिंतामणि’ आणि ‘तिथिनिर्णय’ — यांतील निर्देशानुसार, जर आदल्या दिवशी प्रदोषकाळाची व्याप्ती असेल आणि दुसऱ्या दिवशी अमावास्या तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ टिकून राहील तसेच प्रतिपदेची वृद्धी होत असेल, तर अमावास्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करावे, असे नमूद आहे.
त्यामुळे घोलप यांनी सांगितले की, 21 ऑक्टोबर रोजी अमावास्या तीन प्रहरांपेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती सायं. 8.10 वाजता होत असल्याने प्रतिपदेची वृद्धी देखील आहे. यामुळे धर्मसिंधुतील नियमानुसार लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळात म्हणजेच सायंकाळी सूर्यास्तानंतर 2 तास 23 मिनिटांच्या कालावधीत करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
घोलप यांनी सांगितले की, उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागांत सूर्यास्त 21 ऑक्टोबर रोजी सायं. 7.55 वाजण्यापूर्वीच होत असल्याने, त्या भागांतील मुहूर्त वेगळे असू शकतात.
शेवटी त्यांनी आवाहन केले की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. काहीजण हेतुपुरस्सर चुकीचे मुहूर्त प्रसारित करतात. चंद्र व सूर्य यांच्या गतिच्या गणितीय सिद्धांतानुसारच लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी करावे, असे ज्योतिष तज्ञ संतोष घोलप यांनी सांगितले.
हे हि वाचा: Maratha aarakshan: 58 लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची कुणबी नोंद आहे का? जिल्हानिहाय लिंक तपासा


