Site icon सुपरफास्ट बातमी

शहीद भगतसिंग यांचा संघर्ष केवळ ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधात नव्हता तर भांडवलशाही व जातीव्यवस्था विरोधात आणि स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने होता – कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद; सकल भारतीय समाजाच्या वतीने भगतसिंहांना अभिवादन

सुपरफास्ट बातमी
अहमदनगर (प्रतिनिधी)  २९.९.२०२३
    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्यांनी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले त्यामध्ये शहीद भगतसिंग यांचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. शहीद भगतसिंग यांचा संघर्ष केवळ ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधात नव्हता तर भांडवलशाही व जातीव्यवस्था विरोधात आणि स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने होता. म्हणूनच त्यांना अभिवादन करत असताना आपणही जात-वर्ग आणि स्त्रीदास्य या विरोधात एल्गार पुकारला पाहिजे. हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन माकपचे कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.
    सकल भारतीय समाज व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने कॉम्रेड शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त भगतसिंह स्मारक, पत्रकार चौक येथे अभिवादन सभेत बोलताना सय्यद यांनी वरील मार्गदर्शन केले. भगतसिंह यांच्या पुतळ्यास आनंद शितोळे, अ‍ॅड. विद्या शिंदे, हेरंब कुलकर्णी, संध्या मेढे, समीक्षा वाकळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
   यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन करताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, भगतसिंग यांचे आकर्षण १०० वर्षे होत आले तरी कायम आहे याचे कारण ते एकाचवेळी क्रांतिकारक आणि तत्वज्ञ होते. तरुणाईत आजही ते प्रेरणा म्हणून आहेत. त्यामुळे महाविद्यालयात जाऊन तरुणांना भगतसिंग यांची प्रेरणा जागवत संघटित करायला हवे. महाविद्यालयात जाऊन तरुणांशी बोलणे व कलेचे माध्यम वापरणे हा कृती कार्यक्रम करणे गरजेचे आहे.

Read also: शेवगाव शहरात शहीद भगतसिंग जयंती उत्साहात साजरी.

   सामाजिक व कृषी अभ्यासक आनंद शितोळे म्हणाले की,
   जगभरात भांडवलदार आणि धर्मांध शक्तींची युती झालेली आहे असे आपण म्हणतो त्यावेळी भारताच्या बाबतीत हे वक्तव्य थोडसे दुरुस्त करण्याची गरज आहे. भारतात भांडवलदार आणि धर्मवादी राजकारणाचा बुरखा घेतलेल्या सत्तापिपासू लोकांची युती झालेली आहे. धर्मांध शक्ती असतील तर निदान त्यांची धोरण एकसारखी असतात भलेही ती चुकीची असतील. भारतात यांची धोरण राज्यागणिक बदलताना दिसतात. हिंदीभाषिक उत्तर भारतात गोमाता गोमाता म्हणून सगळे दंगे करतात, झुंडीने माणसाना मारतात आणि सरकार गायीसाठी दवाखाने, रुग्णवाहिका कामाला लावून गोरक्षकाचे समाधान करतात. तीच सरकार गोव्यात, केरळात, आसामात आणि ईशान्य भारतात मात्र “पुरेसे गोमांस उपलब्ध होईल याची आम्ही काळजी घेऊ” म्हणतात जनतेला गोमांस उपलब्ध करून देण्याविषयी जाहीर वक्तव्य मंत्री करतात, म्हणजे उत्तरेत गोमाता मम्मी आणि बाकीकडे यम्मी ? 
    शितोळे पुढे म्हणाले, तीच गोष्ट समान नागरी कायद्याची. नागालँड मधल्या सरकारने थेट विधानसभेत प्रस्ताव मंजूर केलेला आहे कि आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असल्याने आम्हाला समान नागरी कायदा नको आहे, आम्ही लागू करणार नाहीत. ईशान्य भारतातील बहुतेक राज्यांची हीच मागणी आहे. मग एकीकडे तुम्ही समान नागरी कायद्यासाठी विरोधी राज्यांना आणि पक्षांना वेठीला धरणार आणि दुसरीकडे तुमचीच राज्ये कायदा नको म्हणून विधानसभेत प्रस्ताव मंजूर करणार ? एक देश एक कर म्हणायचं मात्र जम्मू काश्मीरमध्ये जीएसटी लागू नाही, इंधनावर जीएसटी लागू नाही आणि मद्यविक्रीवर जीएसटी लागू नाही मग त्याला एक देश एक कर कस म्हणायचं ? गोवंशहत्याबंदी कायदा, समान नागरी कायदा, नागरिकत्व कायदा, अन्य कुठल्याही मुद्द्यावर जिकड जशी सोयीची असेल तशी यांची भूमिका बदलत असेल तर हे धर्मवादी नसून सत्तापिपासू आणि संधिसाधू आहेत हेच सिद्ध होत ना ?
   वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे कॉ. सिध्देश्वर कांबळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते संतोष कानडे, आम आदमी पक्षाच्या ॲड. विद्या शिंदे, रवी केरू सातपुते आदींनी यावेळी मार्गदर्शन.

Read also: सामाजिक कार्यकर्ते ‘निर्भय बनो’चे हेरंब कुलकर्णी यांच्यावर जिवघेणा हल्ला; सामाजिक संघटना घेणार एस.पीं.ची भेट

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजी. अभिजीत एकनाथ वाघ, कॉ.प्रकाश मुनोत, नितीन बनसोडे, दिलीप घुले, असिफखान दूलेखान, अरूण थिटे, आबिदखान दूलेखान, महादेव पालवे, लहूजी लोणकर, आर्की. फिरोज शेख, समीर मुसमाडे, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या समृध्दी वाकळे यांनी परिश्रम घेतले.


हेरंब कुलकर्णी सरांचा शालेय जीवनातील २१ वर्षांनी भेटलेला विद्यार्थी सुरेश आंबेडकर याने कुलकर्णी सरांना अंनिस चा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बागेतीलच फुले व पानांचा पुष्पगुच्छ तयार करून सत्कार केला. सरांचा व सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.





Exit mobile version