प्रतिनिधी (मुंबई ) ०१.१०.२०२३
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा कहर झाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आता तब्बल २०९ रुपये जादा द्यावे लागतील. या दरवाढीमुळे आता राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर १७३१.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी १६८४ रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर १०० रुपयांनी घटला होता. परंतु तात्पुरता दिलासा दिल्यानंतर आता तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात थेट २०९ रुपयांची दरवाढ करत सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा झटका दिला आहे.
व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाली असली तरी घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही दरवाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी घरगुती सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी करण्यात होते. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेली वाढ ही प्रत्येक शहरात वेगवेगळी असुन दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर २०९ रुपयांनी, कोलकात्यात २०३ रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी २०२ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
व्यावसायिक सिलिंडरसाठी आता नेमके किती रुपये द्यावे लागणार?
१ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार, व्यावसायिक सिलिंडरसाठी आता दिल्लीत १५२२.५० रुपयांऐवजी १७३१.५० रुपये द्यावे लागतील. कोलकात्यात १६३६ रुपयांऐवजी १८३९.५० रुपये द्यावे लागतील आणि मुंबईत व्यावसायिक वापराच्या सिलिंडरसाठी १४८२ रुपयांवरुन १६८४ रुपये इतकी दरवाढ झाली आहे. तर चेन्नईत आता व्यावसायिक एलपीजीसाठी १८९८ रुपये द्यावे लागतील.