प्रतिनिधी ( छत्रपती संभाजीनगर ) २९.१२.२०२३
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मुंबईला जाण्याचा मार्ग मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्या-पिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रवासाला किती दिवस लागतील, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले की, आम्हाला काही विशिष्ट तारखेस मुंबईला पोहोचायचे नाही. यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईत जाणारच आहोत. प्रत्येक तुकडीचे स्वतंत्र नियोजन आहे.
असा असेल मार्ग
२० जानेवारी रोजी सराटी ( जालना ) येथून मुंबईचा प्रवास सुरू होईल. शहागड, गेवराई पाडळसिंग, पाथर्डी, तीसगाव, करंजी फाटा, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, वाघोली, पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबईतील आझाद मैदान अशा मार्गाने आरक्षण दिंडी मुंबईत दाखल होईल.
अशी असेल व्यवस्था
यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी आणि छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर सोबत घ्यावे, जेथे रस्त्यात थांबाल तेथेच आपला स्वयंपाक करून खाण्याची व्यवस्था करण्याचे देखील आंदोलकांना आवाहन करण्यात आले आहे.