प्रतिनिधी ( सांगली ) १७.११.२०२३
छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केला होता.
भुजबळांच्या या टीकेवर आता मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नये. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालना येथील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर होते. यावेळी सरकारमधील मंत्री छगन भूजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.
काय म्हणाले मनोज जरांगे ?
मनोज जरांगे यांनी देखील या टीकेला आता प्रत्युत्तर दिल आहे. उगाच सासरा जावयाचा प्रश्न काढायचा नाही. तुम्ही कुठले आहेत, तुमचाही बायोडेटा आमच्याकडे आहे. तुमच्या शेपटावर आम्ही पाय देत नाही उलट तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका. नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत. भान ठेवून वक्तव्य करा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. मराठ्यांच्या पायावर पाय दिल्याने काय होतं ते तुम्हाला कळेल असा इशारा माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी दिला. धमक्या देऊन राज्यातील शांतता बिघडवू नका. सरकारनेही यांच्यावर लक्ष ठेवावे. आम्हाला शांततेत आरक्षण मिळवायचं आहे. ह्यांना मराठयांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून त्यांचा तीळपापड झालाय. असं देखील मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
भुजबळांचं आता वय झालं आहे. आता आम्ही भुजबळांना महत्त्व देणार नाही, असं सुद्धा जरांगे पुढे बोलले आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये कुठलाही वाद नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सकल मराठा समाजाच्या वतीने सांगलीमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित केली होती.
नेमकं काय म्हणाले होते भुजबळ ?
भुजबळ दोन वर्ष तुरुंगातुन बेसन भाकर खाऊन आला , हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकड़े मोडत नाही अशा प्रकारचे वक्तव्य भुजबळांनी जालन्यातील सभेत केलं होत.