बीड येथील मराठा समाज आक्रमक माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांचे पेटवले घर

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी 

प्रतिनिधी ( बीड ) ३०.१०.२०२३

मराठा आंदोलनाचा मुद्दा राज्यभर चांगलाच तापला असून यावर अजुनही तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी गाड्या अडवणे सभा उधळून लावणे असे प्रकार सुरु आहेत. त्यातच आज मराठा आंदोलकांनी बीडमध्ये थेट आमदाराचं घर पेटवलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराजवळ पार्किंग लॉटमधील गाड्यांना मराठा आंदोलकांकडून आग लावण्यात आली. पसरलेल्या आगीमुळे घराचाही काही भाग जळाला आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी बीड जिल्ह्यात मराठा समाज आंदोलक आक्रमक झाले. माजलगावमध्ये मोर्चा सुरू असताना काही आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फोडल्या. तसेच गाड्या जाळण्यात आल्या. यावेळी आमदार सोळंके आणि त्यांचे कुटुंबीय घरामध्येच होते. त्यात कोणत्याही स्वरुपाची दुखापत झाली नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी साखळी उपोषण आणि मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. या रोषातूनच बीडमध्ये आमदाराचे घर जाळण्याची घटना घडली आहे.

Leave a Comment