बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे; १४ नोव्हेंबरला मिरवणूक

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

अहमदनगर (प्रतिनिधी) ५.११.२०२३
     शहरात २००९ पासून म्हणजेच गेल्या चौदा वर्षापासून बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या बळी महोत्सव एकलव्य जयंती समितीच्या अध्यक्षपदी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांची तर खजिनदारपदी ग्रामविकासाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. प्रशांत शिंदे यांची एकमतांनी निवड करण्यात आली. यावेळी उर्जिता फौंडेशनच्या संध्या मेढे, कामगार नेते कॉ. भैरवनाथ वाकळे, मराठा सेवा संघ महानगराध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, विजय केदारे आदी उपस्थित होते.
    येत्या १४ नोव्हेंबरला होणाऱ्या बलिप्रतिपदेला सालाबाद प्रमाणे हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारक ते माळीवाडा येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकापर्यंत पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी पारंपारिक शस्त्रांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक देखील दाखविले जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येवून शेतकरी राजा बळीराजा व आदिवासी सम्राट एकलव्य यांचे स्मरण व गौरव करण्यात येतो. त्यानिमित्ताने बहुजन समाजातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसांच्या विविध प्रश्नांची चर्चा करून त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो.
    याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे येथील स्त्रीविचारवंत, जनवादी महिला संघटनेच्या आणि घर कामगारांच्या नेत्या किरणताई मोघे या मार्गदर्शन करणार आहेत. तरी या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, ही विनंती बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव समितीने केली आहे.

Leave a Comment