सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( सिंदखेड राजा ) १२.११.२०२३
शरद पवारांमुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले, असा
आरोप करत शरद पवारांची तुलना डायर, हिटलरशी करणारे
नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत, अशी माहिती राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव
जाधव यांनी आमदार रोहित पवार यांना पत्र पाठवून दिली आहे.
या पत्रात नामदेव जाधव नामक व्यक्ती सध्या सोशल
मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब
यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव
जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही
संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी शरद पवार
यांच्यावर टीका करत आहे, असा आरोप करण्यात आला
आहे. तसेच, याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी
उघडकीस आणण्याची मागणीही राजे गोपाल जाधव
यांनी केली आहे. यावर स्वतःच्या फायद्यासाठी कोणी असं
करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राजे गोपाल भगवानराव जाधव म्हणतात की सध्या सोशल
मिडिया व इतर प्रसार माध्यमांवर नामदेव जाधव नामक
व्यक्ती मी जिजाऊंचा वंशज म्हणून फिरत आहे. तो स्वत: चा
उल्लेख जिजाऊंचा वंशज, लखोजीराजे यांचा वंशज म्हणून
करत असून तो लखोरीराजे यांचा वंशज नाही. तो फक्त एक
जाधव आडनावाचा व्यक्ती आहे. त्याचा आणि लखोजीराजे
जाधव घराण्याचा कुठल्याही नाते, सोईरसंबंध व वंशावळ
अस्सल यामध्ये उल्लेख नाही. तो फक्त प्रसिद्धीसाठी वंशज
म्हणून शरद पवारांवर टीका करत आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्व लखोजीराजे यांचे
वंशज विनंती करतो की, त्याची कायदेशीर चौकशी करुन
त्याने केलेली फसवेगिरी उजेडात आणावी व त्याच्यावर
फसवणूक आणि अपप्रचाराचा गुन्हा दाखल करावा. त्यामुळे
मुळ राजेजाधव वंशज यांची नाहक बदनामी होत आहे.