Site icon सुपरफास्ट बातमी

नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नये देवेंद्र फडणवीसांनी धाडलं अजित दादांना पत्र

सुपरफास्ट बातमी

नागपुर ( प्रतिनिधी ) ०७.१२.२०२३
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही. परंतू ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. असे आमचे मत आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे. 

ते पुढे म्हणतात सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. 

Read Also: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे. असे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी पाठवून नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्यास स्पष्ट विरोध दर्शविला आहे.

Read Also: निंबळक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंजुश्री कुलट तर उपाध्यक्षपदी अप्पा आमले यांची निवड

Exit mobile version