जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये वाढ होऊन तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करा ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( अहमदनगर ) १६.११.२०२३
जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ होऊन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत. जिल्ह्याच्या विकासाची घौडदौड अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे महसुल,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे,  आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी मान्यवर उपस्थित होते.
सन २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला शासनाने ६३० कोटी रुपयांच्या निधीची तात्पुरती कमाल मर्यादा कळविलेली असुन यंत्रणांकडून योजनानिहाय आराखडा प्राप्त झाल्यानंतर आराखडा राज्यस्तरीय बैठकीमध्ये सादर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

  अहमदनगर जिल्ह्यात अनेक धार्मिकस्थळे व साहसी पर्यटनाची स्थळे असुन या ठिकाणी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. साहसी व धार्मिक पर्यटनाला अधिक प्रमाणात चालना देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या दोन्ही पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल. नेवासा येथेही राज्यासह इतर ठिकाणांहून भाविकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी ज्ञानेश्वरसृष्टी उभारण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात यावा. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडे देण्याचे आवाहनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विस्तार होऊन या ठिकाणी अनेक चांगले उद्योग यावेत व रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. अहमदनगर  येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी  ३०० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शेतीमहामंडळाची ५०२ एकर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच सुपा येथील एमआयडीसीच्या विस्तारासाठी भुसंपादनाची प्रक्रियाही सुरु असल्याचे सांगत जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परदेशासह विविध राज्यात अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा व  ज्ञानाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याचे निर्देशही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. 


रोहित्रे उपलब्ध नसल्याने तसेच ती नादुरुस्त असल्याकारणाने अनेकवेळा ग्रामीण भागातील जनतेला वीज पुरवठा करताना अडचणी येतात.  जनतेला योग्य दाबाने व विनाखंडीत वीज पुरवठ्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ७७ ठिकाणी रोहित्रे मंजूर करण्यात आली असुन २५० ठिकाणी रोहित्रे मंजुर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा परिषद शाळांना अखंडितपणे विद्युत पुरवठा व्हावा यासाठी सर्व शाळांना सोलरद्वारे वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे.  यासाठी आवश्यक असणारा निधी त्या त्या मतदारसंघातील आमदारांकडून २५ लक्ष रुपये व उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांद्वारे रुग्णांना वेळेत लाभ मिळावा यादृष्टीने काळजी घ्यावी. तसेच प्रत्येक शासकीय दवाखान्यांमध्ये औषधीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, यादृष्टीने काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार असुन पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा अहवाल येत्या आठ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.


 इतिहासाचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला आजघडीला सैन्याच्या ताब्यात आहे. हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतआहे.  या किल्ल्याच्या विकासासाठी 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.

बैठकीमध्ये श्री महेश्वर मंदिर कोळपेवाडी ता. कोपरगाव, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर माहेगाव देशमुख ता. कोपरगाव, श्री दत्त मंदिर देवस्थान विठे ता. अकोले, श्री खंडोबा देवस्थान हिररगाव पावसा ता. संगमनेर, श्रीसंत तुळशीराम महाराज देवस्थान, मुठेवडगाव ता.श्रीरामपुर, हरेश्वर देवस्थान कर्जुले हर्या ता. पारनेर व  श्री शनिमंदिर ता. श्रीगोंदा या ग्रामीण तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. 

यावेळी प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या अमृतसरोवर या कॉफीटेबलबुकचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना कृषीकिटचे वाटपही करण्यात आले. 

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी रस्ते, वीज वितरण, आरोग्य यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत उपयुक्त अशा सुचना मांडल्या.बैठकीस सर्व विभागांच्या
प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment