सुपरफास्ट बातमी
प्रतिनिधी ( मुंबई ) ०९.१०.२०२३
युवांच्या प्रश्नांसाठी राज्यात 25 ऑक्टोबरपासून काढण्यात येत असलेल्या राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रेची
yuvasangharshyatra.com ही अधिकृत वेबसाईट आज लाँच करण्यात आली. या माध्यमांतून युवांना यात्रेला ऑनलाईन पाठिंबा देता येईल.
युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी अधिकाधिक युवांनी ऑनलाईन फॉर्म भरून या यात्रेला पाठिंबा द्यावा असं आमदार रोहित पवार म्हणाले.
या यात्रेत आम्हाला अनेक विषय लोकांकडून समजून घ्यायचेत. कंत्राटी भरती, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शिक्षकांची रिक्त पदे, युवा आयोगाची स्थापना, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, 2 वर्षांपेक्षा अधिक काळ बेरोजगार असलेल्या युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सरकारने भरावं, नोकरदार महिलांसाठी जिल्हानिहाय वसतिगृह, शक्ती कायदा, सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांचे सक्षमीकरण, शाळा दत्तक योजना बंद करणे, रिस्कीलिंग, 2 टिअर दर्जाच्या शहरात IT कंपन्या आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखणे, तालुका पातळीवर औद्योगिक युनिट सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करून होतकरू युवांना संधी देणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ही युवा संघर्ष यात्रा असणार आहे. या मुद्द्यांसह यात्रेत लोकांशी चर्चा केल्यानंतर पुढं येणारे मुद्दे अधिवेशनात मांडण्यात येतील असं ते म्हणाले.
हि यात्रा दसऱ्याच्या दिवशी 24 तारखेला महात्मा फुले वाडा, लाल महाल या ठिकाणी भेट देऊन आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे युवांशी संवाद साधतील आणि या यात्रेची औपचारिक सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
पुणे, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर या दहा जिल्ह्यातील 28 तालुके आणि 420 गावांमधून ही यात्रा जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिवाळीही आम्ही यात्रेतच साजरी करणार आहोत. माझे कुटुंबियही यावेळी उपस्थित राहणार आहे. ही कुणा एकाची यात्रा नाही तर आपल्या सर्वांची संघर्ष यात्रा आहे. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आमदार रोहित पवार यांनी तमाम युवा वर्गाला आवाहन केले आहे.