आशियाई क्रिडा स्पर्धेतील महाराष्ट्रीयन खेळाडूंची दिवाळी होणार गोड , बक्षीसांच्या रकमेत तब्बल दहा पटीने वाढ

Photo of author

By Dipak Shirsath

सुपरफास्ट बातमी 

प्रतिनिधी ( मुंबई ) २०.१०.२०२३

राज्यातील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण २०१२ साली घोषित करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्याची योजना शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडणे ही एक सलग चालणारी प्रक्रिया आहे, यामध्ये आजमितीस क्रीडा क्षेत्रातील बदल, पदक संपादन करण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता व ती मिळविण्यासाठी आहार, क्रीडा वैद्यकशास्त्र यांचे सहकार्य, क्रीडा स्पर्धासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, सरावासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, क्रीडा स्पर्थेत वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित होणाऱ्या देशातील असलेल्या वातावरणात किमान एक महिनाआधी जाऊन सराव करणे, अशा वाबी कराव्या लागतात. १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा हैँगझोऊ, चीन येथील स्पर्धेत भारतीय पथकाने आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचाही मोठा वाटा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना इतर राज्यांमार्फत भरघोस मदत दिली जाते. त्यामुळे सदर स्पर्धामध्ये उल्लेखनीय कार्य करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडुूना देण्यात येणाऱ्या बक्षीसांच्या रकमेत सुधारणा करण्यात आली आहे.

५ फेब्रुवारी २०१४ पासुन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १० लाख रुपये तर मार्गदर्शकास २.५० लाख रुपये , रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ७.५० लाख रुपये तर मार्गदर्शकास १.८७ लाख रुपये तसेच कास्य पदक विजेत्या खेळाडूंना ५ लाख रुपये व मार्गदर्शकास १.२५ लाख रुपये दिले जात होते. आता त्या बक्षीसाच्या रकमेत तब्बल दहा पटीने वाढ केली आहे.
सुधारीत रकमेनुसार आता वैयक्तीक क्रिडा प्रकारात सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १ कोटी रुपये तर त्याच्या मार्गदर्शकाला १० लाख रुपये व रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये व मार्गदर्शकाला ७.५ लाख रुपये तसेच कास्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख रुपये व मार्गदर्शकास ५ लाख रुपये इतके पारितोषीक दिले जाणार आहे.
तर सांघिक क्रिडा प्रकारात सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकाला ७.५ लाख रुपये व रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख रुपये व मार्गदर्शकाला ५ लाख रुपये आणि कास्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाख रुपये व मार्गदर्शकास २.५ लाख रुपये तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त न झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी १०.०० लाख रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. 

Leave a Comment