Site icon सुपरफास्ट बातमी

आशा वर्कर व गट प्रवर्तकांची दिवाळी होणार गोड आशांना ७००० तर गटप्रवर्तकांना ६२०० रुपये मानधन वाढ दिवाळी बोनसही मिळणार

सुपरफास्ट बातमी

प्रतिनिधी ( मुंबई ) ०१.११.२०२३
राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ८० हजारांपेक्षा जास्त आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना ७ ,००० रुपये मानधन वाढ तर ३ ,६६४ गटप्रवर्तकांना प्रत्येकी ६ ,२०० रुपये मानधन वाढ तसेच आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ ,००० रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका व संघटनांचे  प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्यात सन २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यात ८० हजाराच्यावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी  आशा सेविकांना ५,००० रुपये मानधन देण्यात येत होते. आता आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात ७ ,००० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही ३ ,००० रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५,००० रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात ३ ,६६४ गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना ६ ,२०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज ६ ,२०० रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे. गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही ८,७७५ रुपये मानधन मिळत असून,  त्यांना आता एकूण २१,१७५ रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. या बैठकीत  आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना २ ,००० रुपये दिवाळी भेटही देण्यात येणार असल्याची  घोषणा आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांनी केली आहे. आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version