प्रतिनिधी ( जालना ) २१.१२.२०२३
आम्ही लढत राहू, सरकारकडे २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ, असं मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आज पुन्हा ठणकावून सांगितलं आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे व मुख्य मंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांचा समावेश होता. यावेळी जरांगे पाटील असं म्हणाले आहेत.
मराठा समाजाने नेहमीच सरकारच्या शब्दांचा सन्मान केला आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही याआधीही वेळ दिला होता. पहिल्यांदा ४० दिवस वेळ दिला. आताही दोन महिने दिले २४ डिसेंबरपर्यंत. समाज म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शब्द पाळण्यास आम्ही कधी कमी पडलो नाही. आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
जरांगे पाटील म्हणाले, ”ज्या ज्या वेळेस सरकारने सांगितलं त्यावेळी मराठा समाजाने त्यांचा सन्मान केला. त्यांनीच ठरवलेले शब्द त्यांनी घ्यावे.” ते म्हणाले, चर्चा ही २४ डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा.
जरांगे पाटिल म्हणाले, त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. आम्ही कायदा तोडा म्हणत नाही. नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडल्या. कुणबी नोंदी असताना त्या ठिकाणी अधिकारी निरंक अहवाल देत आहे. या बाबद ही निर्णय घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी माहिती त्यांनी केली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, अधिकारी जात म्हणून काम करतायेत. त्यांच्या नोटीसमुळे गैरसमज निर्माण होत आहे. त्याबाबद ही सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या अशा कितीही नोटीस जरी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही.