सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांची शासकीय कामे तात्काळ मार्गी लावावी ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Photo of author

By Dipak Shirsath

 


सुपरफास्ट बातमी

पारनेर ( प्रतिनिधी ) ०३.१२.२०२३
तालुक्यातील लोकांना त्यांची शासकीय कामे पूर्ण करताना अनेक वेळा अडचणी येतात, त्यांना अडचणी येऊ नये यासाठी सर्वसामान्यांच्या भावना समजून घेऊन त्यांची प्रलंबित शासकीय कामे तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे महसूल , पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.


पारनेर येथील गणेश मंगल कार्यालय सभागृहात तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात,  पालकमंत्री विखे पाटील बोलत होते .यावेळी त्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड ,जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाणे, गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
            

पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत या योजनांची अधिक गतिमान पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. लोकांना त्यांचे अधिकार माहित झाले आहेत त्यांचा अधिकार त्यांना दिला पाहिजे या उद्देशाने प्रशासनाने काम करावे. हे शासन शेतकऱ्यांचे ,गोरगरिबाचे शासन आहे. शेतकरी व गोरगरिबांना मदत करणे हे शासनाचे प्रमुख ध्येय असून त्या दृष्टीने शासन काम करीत आहे. 


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे. गोरगरिबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत  या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे. तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमातून लोकांच्या घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ दिला जात आहे.  सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
            

पारनेर तालुक्याचे तहसीलदार,गट विकास अधिकारी यांनी  पुढील एक महिन्यात सर्व  गावातील ग्रामसभा घेऊन लोकांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत कामाचा आढावा घेऊन पाणीपुरवठा योजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी. गावातील लोकांच्या वीज वितरणाबाबत तक्रारी सुद्धा सोडवाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 


पालकमंत्री विखे पाटील यांनी कार्यक्रमात तालुक्यातील ग्रामस्थांच्या पाणीपुरवठा योजना अंमलबजावणी ,वीज वितरण ,घरकुल योजना ,आदी विषयांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी तात्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी, कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमात राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत  योजना, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय विभागाच्या, एस टी महामंडळ तर्फे विद्यार्थ्यांना पास वाटप या योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व लाभाचे वाटप पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला विविध विभागांचे विभाग प्रमुख , कर्मचारी, पारनेर परिसर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group