वेरूळ-अजिंठा महोत्सवात निमंत्रित वरिष्ठ न्यायमूर्तींना खुर्चीवरून उठवले

Photo of author

By Dipak Shirsath

 

सुपरफास्ट बातमी

छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी ) ०३.०२.२०२४
वेरूळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात शुक्रवारी रात्री उद्घाटन कार्यक्रमात महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्तींना जागेवरून उठविण्यात आल्याने उपस्थित सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब हा कार्यक्रम सोडून निघून गेल्याची घटना घडली.

न्यायमूर्ती निघून जात असल्याने चूक लक्षात येऊन महोत्सवाचे संयोजक असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायमूर्तींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘यापुढे आम्हाला कार्यक्रमाला आमंत्रित करू नका’, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.


वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला शुक्रवारी सोनेरी महल येथे प्रारंभ झाला. या महोत्सवाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती सहकुटुंब उपस्थित होते. या सर्वांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास महोत्सवासाठी नेमण्यात आलेले प्रोटोकॉल अधिकारी आणि सुरक्षारक्षक आले आणि त्यांच्याकडून पहिल्या रांगेतील सोफ्यावर बसलेल्या वरिष्ठ न्यायमूर्तींना एका गार्डमार्फत हात धरून उठून मागील रांगेत जाऊन बसण्यास सांगण्यात आले.समोर हा प्रकार पाहून मागील रांगेत बसलेले अन्य न्यायमूर्तीं आणि त्यांचे कुटुंबीय उठून उभे राहिले. यावेळी सर्वच न्यायमूर्तींनी त्यांच्या परिवारासह कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ही बाब पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक विजय जाधव आणि महोत्सवाचे मुख्य सल्लागार दिलीप शिंदे यांना समजताच त्यांनी न्यायमूर्ती महोदयांना गाठून माफी मागितली.


महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या न्यायमूर्तींमध्ये न्या. मंगेश पाटील, न्या. नितीन सूर्यवंशी, न्या. संदीप मोरे, न्या. एस.ए. देशमुख, न्या. आर.एम. जोशी, न्या. एस.जी. चपळगावकर, न्या. एस.पी. ब्रह्मे, न्या. नीरज धोटे यांचा समावेश होता. दरम्यान, या प्रकाराची सध्या प्रशिक्षणासाठी रजेवर असलेल्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनीही दखल घेतल्याची माहिती मिळाली.

Leave a Comment

Superfast Batami Logo
About | Contact | Privacy Policy
Join WhatsApp Group